
सामना ऑनलाईन, मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ठाकरे’ या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर बुधवार 26 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘ठाकरे’ चित्रपटावर आधारित स्पेशल व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्या व्हिडीओला अल्पावधीत सोशल नेटवर्किंग साईट्सवर दमदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ‘ठाकरे’ सिनेमाविषयीची चांगलीच उत्सुकता वाढली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी या सिनेमात शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारत असून येत्या 25 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
जेव्हा सचिन बाळासाहेबांच्या आठवणींत रमतो…
ट्रेलरच्या चार दिवस आधी रिलीज झालेल्या या व्हिडीओत अनेक जण बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देताना दिसत आहेत. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही बाळासाहेबांच्या आठवणींत रमलेला दिसत आहे. व्हिडीओत बाळासाहेबांविषयी सचिन म्हणतोय, आम्ही शिवाजी पार्कवर क्रिकेटचा सराव करायचो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा असली की जोरदार तयारी सुरू असायची. बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी लोक आतूर असायचे. या व्हिडीओत सचिनने बाळासाहेबांसोबतच्या भेटीबद्दलही सांगितले आहे. जेव्हा मी बाळासाहेबांना भेटायला जायचो तेव्हा प्रत्येक वेळी मी निघण्यापूर्वी ‘जा, देशाचे नाव उज्ज्वल कर, देशाला गौरव वाटेल असा खेळ कर,’ असे न विसरता म्हणायचे. त्यांचे हे शब्द म्हणजे मला मिळालेला त्यांचा आशीर्वाद असायचा. मी तसाच खेळ करण्याचा प्रयत्न करायचो, अशी आठवण सचिनने सांगितली आहे.
अडीच मिनिटांच्या या स्पेशल व्हिडीओत शिवसैनिक आणि सर्वसामान्यांच्यादेखील प्रतिक्रिया पाहायला मिळतात. बाळासाहेबांचा आवाज नेहमी सत्यासाठी आणि हक्कासाठी असायचा, असे अजिंक्य देव याने म्हटले आहे. बाळासाहेबांचा दरारा वाघाप्रमाणे होता, असे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त इसाक बागवान यांनी म्हटले आहे. वाघाच्या डरकाळीने अख्खे जंगल चिडीचूप होऊन जाते त्याप्रमाणे बाळासाहेब स्टेजवर आल्यावर अख्खा महाराष्ट्र चिडीचूप होऊन जायचा, अशी प्रतिक्रिया देताना तरुणाई व्हिडीओत दिसत आहे. शिवसेनेची ताकद म्हणजे महिला, असे बाळासाहेब नेहमी म्हणायचे, अशी आठवण महिला शिवसैनिकाने जागवली. या सगळ्या प्रतिक्रियांच्या दरम्यान शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाचे अंशही या व्हिडीओत बघायला मिळतात.
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या एका हिंदूच्या केसाला जरी धक्का लागला तर हजला जाणारे एकही विमान मुंबईतून उडू देणार नाही. एवढंच काय तर जगातून एकही विमान हजला पोहोचू देणार नाही, अशी डरकाळी शिवसेनाप्रमुखांनी फोडली होती. त्या स्मृती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्हिडीओत जागवल्या आहेत.























































