
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित बहुचर्चित ‘ठाकरे’ या सिनेमाचा ट्रेलर आज, 26 डिसेंबर रोजी कार्निव्हल आयमॅक्स वडाळा येथे प्रदर्शित होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शानदार सोहळा रंगणार आहे.
‘ठाकरे’ या भव्यदिव्य सिनेमाची हिंदी आणि मराठी भाषेत निर्मिती होत असून दोन्ही भाषांतील ट्रेलरचे आज लाँचिंग होईल. दुपारी 1.30 वाजता हिंदी ट्रेलर तर दुपारी 4 वाजता मराठी ट्रेलर प्रदर्शित होईल. यावेळी चित्रपटात शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, निर्माते आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अभिनेत्री अमृता राव, व्हायकॉम 18 स्टुडियोजचे सीओओ अजित अंधारे, कार्निव्हल मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष श्रीकांत भसी, वर्षा राऊत, सहनिर्मात्या पूर्वशी राऊत, विधिता राऊत आणि सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित राहणार आहेत. ‘ठाकरे’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलर लाँचिंग
कुठे: कार्निवल आयमॅक्स, वडाळा
कधी: 26 डिसेंबर 2018
वेळ: हिंदी ट्रेलर दुपारी – 1.30 वाजता
मराठी ट्रेलर – दुपारी 4 वाजता
21 डिसेंबर 2017 रोजी चित्रपटाचा ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये टीझर लाँच करण्यात आला होता. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या टीझरने तमाम चित्रपटरसिकांची आणि हिंदुस्थानी जनतेची मनं जिंकून घेतली आहेत. ठाकरे सिनेमातील गाण्यांचे रेकॉर्डिंग अंधेरीच्या यशराज स्टुडियोत ऑक्टोबर महिन्यात झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस या रेकॉर्डिंगला उपस्थित राहून सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. अर्थपूर्ण शब्द, सुंदर चाल आणि जोशपूर्ण संगीत यामुळे ‘ठाकरे’ सिनेमातील गाणी सुपरडुपर हिट होणार आहेत, यात शंकाच नाही.
कमालीची उत्सुकता, स्पेशल व्हिडीओंना लाखो हिटस्
‘ठाकरे’ सिनेमाच्या ट्रेलरच्या पार्श्वभूमीवर दोन स्पेशल व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. या दोन्ही व्हिडीओंना अल्पावधीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाखो हिटस् मिळाल्या आहेत. एका व्हिडीओमध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता अजिंक्य देव यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या व्हिडीओला अवघ्या तीन दिवसांत 20 लाखांहून अधिक ह्यूज आहेत. त्यानंतर रिलीज झालेल्या दुसऱया व्हिडीओमध्ये अभिनेता संजय दत्त याने ‘बालासाहब सिर्फ लीडर नहीं, टायगर थे’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. या दोन्ही व्हिडीओंमुळे ‘ठाकरे’ सिनेमाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.






























































