थायलंड-कंबोडिया सीमेवर भगवान विष्णूंच्या मूर्तीची विटंबना

थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर भगवान विष्णूची मूर्ती पाडण्यात आली. यामुळे जगभरातील भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या घटनेनंतर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत ‘असे अनादर करणारे हे कृत्य जगभरातील भाविकांच्या भावना दुखावणारे आहे,’ असे म्हटले आहे. दोन देशांमध्ये दोन आठवडय़ांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या संघर्षानंतर थायलंडच्या लष्कराने ही मूर्ती पाडली असल्याचे सांगितले जात आहे. थायलंड-कंबोडिया सीमेवरील या देवता या प्रदेशातील लोकांसाठी अत्यंत पूजनीय आहेत आणि या आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हिंदुस्थानने दोन्ही देशांना पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले असून ‘असा अनादर करणाऱया कृत्यांमुळे जगभरातील भाविकांच्या भावना दुखावल्या जातात,’ असेही निवेदनात पुढे म्हटले आहे. ‘भू-भागासंबंधी दावे काहीही असले तरी असे अनादर करणारे कृत्य जगभरातील भाविकांच्या भावना दुखावणारे आहे आणि असे कृत्य घडू नये. आम्ही पुन्हा दोन्ही बाजूंना संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करतो, जेणेकरून शांतता प्रस्थापित होईल आणि अधिकची जीवितहानी तसेच मालमत्ता व सांस्कृतिक वारशाचे नुकसान टाळता येईल,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात पुढे म्हटले आहे.

थाई सरकारने आरोप नाकारले

थाई यंत्रणांनी आपली बाजू मांडत हिंदुस्थानला प्रत्युत्तर दिले. थाई अधिकाऱयांनी म्हटले की, या मूर्तीला धार्मिक स्थळ म्हणून मान्यता मिळालेली नव्हती, तसेच त्याची उभारणी अलीकडच्या काळात झाली होती. तसेच सीमेवर तणाव वाढीस कारणीभूत ठरू शकणारी संवेदनशील चिन्हे हटविण्याच्या हेतूने हे पाडकाम करण्यात आले आहे.