
ठाणे आणि साताऱ्यात ड्रग्जचं केंद्रबिंदू आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते राजन विचारे म्हणाले आहेत. आज राजन विचारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळीच बोलताना ते असं म्हणाले आहेत.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राजन विचारे म्हणाले की, “महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यात जिल्ह्यात ड्रग्जचं रॅकेट सुरू आहे. आज तुम्ही बघितलं असेल, शाळेच्या बाहेर सर्रासपणे ड्रग्जची विक्री सुरू आहे. हे ड्रग्ज कुठून येत आहेत? या ड्रग्जचा केंद्रबिंदू सातारा आणि ठाण्यात आहे. तुम्ही पाहिलं असेल, याला तोळ्याचा भाव आहे. मी आतापर्यंत एवढ्या ३५ वर्षांच्या राजकारणामध्ये इतका पैसा कुठल्याही राजकारण्याने कमावल्याचे पाहिले नाही. इतका पैसे एखादा राजकरणी निवडणुकीत खर्च करत असेल तर, मला वाटतं, पुढे निवडणुका घेऊच नये.”
यावेळी ठाण्यात नितीन कंपनी परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेरील एक व्हिडीओ अविनाश जाधव यांनी माध्यमांसमोर सादर केला. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विक्रांत घाग यांना एक पोलीस कर्मचारी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेऊन जात असल्याचा दावा अविनाश जाधव यांनी केला. या उमेदवाराला शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारी मिळाली होती. असे असतानाही त्यांना एकनाथ शिंदे यांच्या निवावस्थानी का नेले जात होते? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली.
अविनाश जाधव म्हणाले की, “आमच्या नगरसेवकांना पाच-पाच कोटींच्या ऑफर्स देण्यात आल्या. हे पाच कोटी रुपये आले कुठून? मी आता साहेबांशी (राज ठाकरे) बोलत होतो, ते म्हणाले, मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक उपमुख्यमंत्री पाहिले. मात्र एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिलेला नाही. हा पैसा कुठून आला? टेंडर वैगरे मधून इतका पैसा येऊ शकत नाही. मागे सातारच्या गोडाऊनमध्ये धाड पडली, त्या माध्यमातून पैसा येतोय का? असा संशय आमच्या मनात आहे. याची चौकशी व्हावी, ही माची मागणी आहे.”


























































