
सिडकोतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासन आता अॅक्टिव मोडवर आले आहे. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सहनिबंधक कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केला. दक्षता विभागाने या कार्यालयावर अचानक धाड टाकून झाडाझडती घेतली. याच कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यात तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. दक्षता विभागाच्या या धडक कारवाईमुळे सिडकोच्या मलाईदार विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता विभागाच्या पथकाने बुधवारी अचानक सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक संकुलात असलेल्या सहनिबंधक कार्यालयावर धाड टाकली. या पथकाने अचानक झाडाझडती सुरू केल्यानंतर। सहनिबंधक कार्यालयातील सर्वच कर्मचारी, अधिकारी गांगारून गेले. या कार्यालयातील सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. अचानक झालेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे सहनिबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच पळापळ उडाली.
नागरिकांबरोबर संवाद साधला
नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील सर्वच गृहनिर्माण संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या कार्यालयाच्या माध्यमातून केले जाते. नवी मुंबईत सध्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे वारे सुरू झाले आहे. त्यामुळे सहनिबंधक कार्यालय विशेष चर्चेत आले आहे. मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी यावेळी या कार्यालयात आलेल्या नागरिकांशी संवाद साधून जर कोणी लाच मागत असेल तर दक्षता विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
सीसीटीव्ही बसवणार
सहनिबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात लाचखोरी होत असल्याच्या तक्रारी सिडको प्रशासनाला आल्या आहेत. त्यामुळे या कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या हालचाली सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सुरू केल्या आहेत. सिडकोमधील साडेबारा टक्के योजना, वसाहत विभाग हे मलाईदार विभाग म्हणून ओळखले जातात. या विभागांवर प्रशासनाकडून आता बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सहनिबंधक कार्यालयात दक्षता विभागाने केलेल्या झाडाझडतीचा अहवाल लवकरच प्रशासनाला सादर केला जाणार आहे.