ठाण्यात देशातील पहिल्या मोठ्या क्लस्टर योजनेचा नारळ फुटला

632

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

शहरातील इमारती अधिकृत की अनधिकृत याची नेहमीच चर्चा होते. भले इमारती अनधिकृत असतील, पण त्या कोणी ठरवल्या? दगड, विटा आणि सिमेंटच्या या अनधिकृत इमारतींमध्ये जिवंत माणसंच राहतात. निवडणुकीच्या वेळी तुम्ही  मतं मागायला जाता ना! मग ही मतं अधिकृत नाहीत काय? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले, पण शिवसेना मात्र वचनाला जागली आहे. इमारती अधिकृत असोत वा अनधिकृत.. त्यातील सर्वांना क्लस्टरच्या माध्यमातून हक्काचे घर देणारच, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

  • पोलीस, चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्के घरे राखून ठेवा!

शहरी भागात घरांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. पोलिसांच्या पाठीशी सरकार कायम ठामपणे उभे राहिले आहे. एकीकडे क्लस्टरच्या माध्यमातून घरे उभारण्याचा शुभारंभ गुरूवारपासून होत असतानाच पोलीस व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्के घरे राखून ठेवावीत, असे आदेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरूनच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिले.

  • 323 चौरस फुटांचे घर मिळणार

अनेक लढ्यांनंतर ठाणेकरांना क्लस्टरच्या माध्यमातून घरे देण्याचे स्वप्न साकार झाले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारा भूमिपूजन सोहळा म्हणजे ऐतिहासिक क्षण असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितले. क्लस्टर योजनेतील अडथळे दूर झाले असून 323 चौरस फुटांचे मालकीहक्काचे घर देण्यात येणार आहे, तर अधिकृत इमारतीमधील रहिवाशांना 25 टक्के जादा जागा मोफत मिळणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

ठाणेकरांचे जीवन  सुखकारक करू!

शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. रस्त्यांपासून ते नाट्यगृहांपर्यंत अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविले. आता अत्याधुनिक योजनांच्या माध्यमातून ठाणेकरांचे जीवन अधिक सुखकारक होईल, असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात दिव्यांगांना स्टॉल्सचे तसेच बीएसयूपी अंतर्गत घरांचे वाटप करण्यात आले.

या प्रकल्पांचे भूमिपूजन

  • ठाणे ग्लोबल इंपॅक्ट हब
  • कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर
  • वॉटर फ्रंट प्रकल्प
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
  • घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती
  • बांधकाम व तोडफोड कचरा व्यवस्थापन योजना
  • शहरी वनीकरण
  • सायन्स सेंटर.

आता उघड भेटतो

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या दोस्तीचा उल्लेख स्वतः आव्हाड यांनी गुरुवारी आपल्या भाषणात जाहीरपणे केला. ते म्हणाले, आमची दोस्ती पूर्वीपासूनचीच आहे. तेव्हा आम्ही चोरून भेटायचो.. पण आता उघडपणे ठाण्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र भेटतो व फिरतोही.

वीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर ठाणेकरांच्या घरांचे स्वप्न साकार होत असून देशातील पहिल्या मोठ्या क्लस्टर योजनेचा नारळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाढवण्यात आला. किसननगर, राबोडी, हाजुरी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर येथे हा भव्यदिव्य प्रकल्प साकारण्यात येणार आहे. किसननगर येथे झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ठाणे महानगरपालिका राबवीत असलेल्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेचे आपल्या खास शैलीत कौतुक केले. ते म्हणाले, हा प्रकल्प म्हणजे एक प्रकारचे धाडस आहे आणि हे धाडस शिवसेनाच करू शकते.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे आज प्रथमच ठाणे शहरात आले. त्याचा उल्लेख करीत ते म्हणाले, शिवसेना आणि ठाणे तसेच ठाणेकर आणि शिवसेना यांचे नाते वर्षानुवर्षे अतूट राहिले असून यापुढेही ते कायम राहील. ठाण्यात लाखो कुटुंब जीव मुठीत धरून राहत असून त्यांना घर देण्यासाठी शिवसेनेने मोठा लढा पुकारला. अगदी मोर्चे, आंदोलनेदेखील झाली. जो क्लस्टर प्रकल्प व्हावा म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटलो त्याच प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचं भाग्य मला लाभलं. हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

क्लस्टरच्या लढ्यासाठी पुढाकार घेणारे शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. ते म्हणाले की, शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक लढाया करून अखेर हा प्रश्न सोडवला. आता शिवसेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी असल्याने वेगळ्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आले आहे, ते देशाला दिशा दाखवणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, उपनेते अनंत तरे, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिक्षण सभापती विकास रेपाळे, विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी, आयुक्त संजीक जयस्वाल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, शिवाजी दौंड, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या