वृद्ध महिलांना बोलण्यात गुंतवून अथवा मानेवर किडा पडल्याचे सांगून गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात उडवणाऱ्या चोरट्याने मीरा- भाईंदरमध्ये धुमाकूळ घातला होता. या बोलबच्चनगिरी करणाऱ्या अट्टल चोरट्याने पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. महिलाही एकट्या बाहेर पडण्यास धजावत नव्हत्या. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रदीप बॅनर्जी (41) रा. वाघराल पाडा, बोयदा पाडा वसई याला कोलकाता येथून अटक केली आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचे 21 गुन्हे दाखल आहेत.
मंदिर परिसरात रेकी करून प्रदीप बॅनर्जी वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करायचा, चेन स्नॅचिंग करताना एकट्या वयोवृद्ध महिलांना हेरून बोलबच्चन करत बोलण्यात गुंतवून ठेवायचा. याचवेळी तो मानेवर किडा पडल्याचे सांगून हातोहात गळ्यातील दागिने लंपास करायचा. नयानगर, शांतीनगर, सृष्टी, पेणकर पाडा, मिरागाव, चेकनाका आणि दहिसर, बोरिवली येथील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास करून शेवटी आरोपी बॅनर्जीला त्याच्या कोलकाता या मूळ शहरातून अटक करण्यात आली. आरोपीवर एकूण 21 गुन्हे दाखल आहेत.