अनैतिक संबंधातून गळा चिरून पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बलराम उर्फ शेखर मिश्रा (27) असे मृत पतीचे नाव आहे. बलराम याच्या बायकोने प्रियकराच्या मदतीने हा कारनामा केला असून पुरावा नष्ट करण्यासाठी तिने नवऱ्याचा मृतदेह बॉक्समध्ये भरून कशेळी खाडीत फेकला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी पत्नी राधा मिश्रा (25) व अनुभव पांडे (23) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
काल्हेर रेतीबंदर रोड येथील ओम साई अपार्टमेंट येथे राहणारा बलराम मिश्रा हा अचानक गायब झाल्याने त्याच्या भावाने नारपोली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान चौकशी सुरू असताना पोलिसांना पत्नीवर संशय आल्याने तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिली.
तिने हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी पतीचा मृतदेह बॉक्समध्ये भरला आणि कशेळीच्या खाडीत फेकून दिल्याचे सांगताच पोलिसांनी राधा व अनुभव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी खाडीपात्रात मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले आहे.
विवाहबाह्य प्रेमसंबंधातून हत्या
बलराम व राधा या दोघांचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र राधा हिचे उत्तर प्रदेशात राहणाऱ्या अनुभवसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमप्रकरणाची कुणकुण बलरामला लागल्यानंतर त्याने त्या दोघांना विरोध केला. मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून त्या दोघांनी धारदार शस्त्राने बलरामची हत्या केली.