रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, ठाणेकर नाट्य रसिकांच्या गर्दीत गडकरी रंगायतनचा पडदा उघडला

ऐतिहासिक ठाण्याचे वैभव असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचा पडदा आज तब्बल दहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा उघडला. तिसरी घंटा झाली. त्यापाठोपाठ नटराज आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, अशी उद्घोषणा पिट्टातून होताच गडकरीचा मखमली पडदा पुन्हा उघडला. नूतनीकरण केलेल्या गडकरी रंगायतनचे नवे रंगरूप पाहून ठाणेकर हरखून गेले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांना दिलेल्या वचनानुसार शहरात राम गणेश गडकरी रंगायतन हे पहिले नाटय़गृह उभे राहिले. 1978मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची 1998मध्ये पहिल्यांदा मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता तब्बल 26 वर्षांनी पुन्हा एकदा नूतनीकरण केले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, आमदार, पालिका आयुक्तांसह कलाकार, निर्माते, रंगकर्मी आणि रसिक मोठय़ा संख्यने उपस्थित होते.

वाटचालीच्या ध्वनिचित्रफितीने इतिहासाला उजाळा

रंगायतनच्या वाटचालीची ध्वनिचित्रफीत रसिकांना दाखवण्यात आली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांना दिलेल्या पहिल्या भेटीची जुनी आठवण झाली.

रुपडे पालटले

ऑक्टोबर 2024मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी महापालिकेने चर्चा व प्रत्यक्ष पाहणीही केली. त्यानुसार गडकरी रंगायतनचे संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आले आहे. यासाठी तब्बल 36 कोटींचा निधी राज्य सरकारने दिला. ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज स्वातंत्र्यदिनी नूतनीकरण केलेल्या रंगायतनचे लोकार्पण करण्यात आले.