संपूर्ण ठाणे जिल्हा 11 जुलैपर्यंत ‘लॉक’; भाजी, किराणा, औषधे मिळणार

1016

ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या चार प्रमुख महापालिकांनी लॉकडाऊन जारी केल्यानंतर आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी टाळेबंदी  जाहीर केली आहे. अंबरनाथ, बदलापूर या नगर परिषदांसह शहापूर, मुरबाड नगरपंचायत आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या संपूर्ण क्षेत्रात गुरुवारी  मध्यरात्री 12 वाजेपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. पुढील 10 दिवस म्हणजे 11 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. केवळ औषधे, भाजी, किराणा यासारख्या अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी खरेदी- विक्रीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांच्या पुढे गेली असून आतापर्यंत 1100 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. असे असले तरी सध्या जिल्ह्यामध्ये 16 हजारांपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिकांपैकी उल्हासनगर वगळून सर्व ठिकाणी कडकडीत लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, या महापालिकांसह जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अंबरनाथमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. कुळगाव- बदलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 800 च्या घरात आहे. तर ग्रामीण भागातही दीड हजाराचा टप्पा पार झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी 2 जुलैच्या मध्यरात्रीपासून 11 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.

पनवेल, भिवंडीतही कडक लॉकडाऊन
पनवेल महापालिकेने 3 ते 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. 3 जुलैला रात्री 9 वाजल्यापासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असून नागरिकांनी दहा दिवस पुरेल इतका भाजीपाला, किराणासह इतर साहित्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत खरेदी करून ठेवण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान भिवंडी महापालिकेने 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. 18 जूनपासून शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनची मुदत 3 जुलैला संपत आहे. मात्र, आता 11 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

  • सर्व नगर परिषद, नगरपंचायत व ग्रामीण क्षेत्रात किराणा, औषधे, भाजीपाला, फळे, बेकरी व दूध इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची विक्री व वाहतूक सुरू राहणार आहे.
  • औषधे व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि मालवाहतूक वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदी असेल.
  • जिल्ह्यामध्ये केवळ अधिकृत प्रवास परवाना, ई-पासधारक वाहनांनाच एण्ट्री देण्यात येणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या