
बाप्पाला सहजपणे निरोप देता यावा यासाठी ठाणे महापालिकेने हायटेक व्यवस्था उभारली आहे. क्यूआर कोडवर क्लिक करताच गणरायाचे विसर्जन कोणत्या तलावात करावे, मार्ग कोणता यासह सर्व प्रकारची माहिती एका क्षणात उपलब्ध होणार आहे. पालिका प्रशासनाने खास हरित विसर्जन अॅप तयार केला असून गणेशभक्तांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्याशिवाय पालिकेने लिंकदेखील तयार केली आहे.
ठाणे शहरातील गणेशोत्सव यावर्षीदेखील धूमधडाक्यात साजरा होणार असून घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे. ठाणे महापालिकेनेही गणरायाचे आगमन व विसर्जन सुरळीतपणे व्हावे यासाठी नियोजन केले आहे. आज आयुक्त सौरभ राव यांनी यासंदर्भात माहिती घेताना सांगितले की नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असून सहा फुटांवरील गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन होणार आहे. उच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन केले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
२३ कृत्रिम तलाव
यावर्षी गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने २३ कृत्रिम तलाव निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ फिरती विसर्जन केंद्रे असून नऊ खाडी घाट आहेत. तसेच १० मूर्ती स्वीकृती केंद्र उभारण्यात येणार आहेत. एकूण १३४ ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाची व्यवस्था केली आहे. दरम्यान विसर्जन सोयीचे व्हावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. विसर्जनाचे मार्ग आणि ठिकाणे याची माहिती मिळवण्यासाठी https://ecovisrjan.com/ वर अॅप व क्यूआर कोडची लिंक उपलब्ध होणार आहे.
दोन सत्रांमध्ये मनुष्यबळ
उथळसर, नौपाडा, कळवा, दिवा, माजिवडा, लोकमान्यनगर, वागळे, वर्तकनगर येथील प्रभाग समितीनिहाय विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. त्याशिवाय विसर्जनाच्या ठिकाणी दोन सत्रांमध्ये ठाणे पालिका मनुष्यबळाची व्यवस्था करणार आहे. क्रेन, वाढीव बार्ज आदी यंत्रसामग्रीदेखील तैनात केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले.