
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच ठाणे महापालिका प्रशासनाचे ‘मिशन निवडणूक जोरात’ सुरू झाले आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केला असून तो नगरविकास खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यानुसार ठाण्यात 32 वॉडमिध्ये प्रत्येकी 4 तर एका वॉर्डात 3 लोकप्रतिनिधी असणार आहेत. 2017 च्या पालिका निवडणुकीनुसार नवीन प्रभाग रचना तयार करण्यात आली असून अंदाजे 20 लाख ठाणेकर 131 नगरसेवक निवडणार आहेत.
प्रशासकाच्या हाती असलेल्या ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार डोळे लावून बसले आहेत. अद्याप तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मात्र रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. असे असले तरी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांच्या प्रभाग रचनेची लगबग सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. ही प्रभाग रचना तयार करताना जनगणनेनेची प्राप्त माहिती, प्रत्यक्ष स्थळांची पाहणी, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे, प्रभागाच्या हद्दी तपासणे या प्रक्रिया पूर्ण केल्या असल्याचे माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
रचना ‘जैसे थे’ असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली
2017 च्या महापालिका निवडणुकीनुसार आगामी निवडणुकीत चार सदस्यांचे 32 आणि तीन सदस्यांचा एक असे 33 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रभागांची सुरुवात घोडबंदर मार्गावरील गायमुख येथून तर शेवटचा प्रभाग हा दिव्यातील तीन पॅनलचा करण्यात आला आहे. प्रभाग रचना जवळपास ‘जैसे थे’ ठेवण्यात आली असल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
प्रारूप आराखड्याचे वेळापत्रक
- 21 ऑगस्ट प्रारूप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता.
- 2 ते 8 सप्टेंबर प्रारूप आराखड्यावर सूचना आणि हरकती.
- 9 ते 15 सप्टेंबर विकास खात्याकडून निवडणूक आयोगाला आराखडा सादर.
- 16 ते 17 सप्टेंबर अंतिम आराखडा नगरविकास खाते निवडणूक आयोगाला पाठवणार. 3 ते 6 ऑक्टोबर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार.
गेल्या दहा वर्षांत झालेली लोकसंख्या वाढ लक्षात घेता नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्यामुळे ठाणे महापालिकेत 11 नगरसेवक वाढणार होते. मात्र विद्यमान सरकारने पालिका निवडणुका जुन्या पद्धतीचे घेण्याचे निर्णय घेतला आहे.
खाडीच्या पलीकडे आणि अलीकडे अशा पद्धतीने ठाणे शहर विभागले गेले आहे. किंबहुना ठाण्याच्या या दोन अविभाज्य बाजू आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूकडील लोकसंख्येचा विचार करून प्रभागांची रचना करण्यात आली आहे.
तत्कालीन आयुक्त बिपीन शर्मा यांच्यावर दबाव आणून सत्ताधारी पक्षाने आपल्या मनाप्रमाणे प्रभाग रचना केली होती. प्रभागांची संख्या शहरात अधिक दाखविली होती आणि खाडीच्या पलीकडे म्हणजेच कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ या परिसरात कमी दाखवली होती असा आरोप करण्यात आला होता.