ठाणे पालिकेच्या तिजोरीची घागर उताणी, सक्शन गाड्यांवरील कर्मचाऱ्यांना तीन महिने पगाराची कवडीही नाही

स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अक्षरशः खडखडाट झाला असून कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास ओढाताण होऊ लागली आहे. सक्शन गाड्यांवरील कर्मचाऱ्यांना तर तीन महिने पगाराची कवडीही मिळालेली नाही. अत्यंत चोख काम करून देखील कामगारांचा पगार वेळेत होत नसल्याने ऐन सणासुदीत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा स्वातंत्र्यदिनापूर्वी वेतन न दिल्यास १८ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कटोरा घेऊन भीक मागो आंदोलन करू असा इशारा या कामगारांनी दिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात सेप्टिक टाकी, मलवाहिनी, चेंबर्स आदी चोकअप काढण्याचे काम पुण्यातील ठेकेदारामार्फत मे महिन्यापासून सुरू आहे. या ठेकेदाराने कामगारांना मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांचे वेतन अद्याप अदा केलेले नाही. त्यामुळे सदर कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अतिशय हाल होत आहेत. कामगार उपायुक्त ठाणे यांच्याकडून ७ ऑगस्टपर्यंत कामगारांना वेतन अदा करण्याच्या लिखित सूचना असतानादेखील वेतन दिलेले नाही. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्तांच्या दाल नात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा केल्यांनतर आश्वासने दिली, परंतु कामगारांना वेतन न मिळाल्याने आणि अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे.

हाच स्वातंत्र्याचा अमृतकाल आहे का?

आता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचे झाले काय आणि आमच्या हाती आले काय? हाच अमृतकाल आहे का? असे प्रश्न कामगार विचारत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या आधी वेतन अदा न केल्यास १८ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयासमोर हातात कटोरा घेऊन भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया यांनी दिला आहे.