
गणेशोत्सव अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असताना ठाण्यातील 88 मंडळांचे मंडप उभारणीचे परवानगी अर्ज महापालिकेच्या टेबलावर पडून आहेत. यापैकी वर्तकनगर प्रभाग समिती हद्दीतील एकाच मंडळाला परवानगी देण्यात आली असून उर्वरित मंडळे अजूनही परवानगीच्या वेटिंगवर आहेत. दरम्यान, पालिका परवानगी कधी देणार? आम्ही मंडप कधी उभारणार? या विवंचनेत मंडळाचे कार्यकर्ते आहेत.
मुंबई, पुणेपाठोपाठ ठाण्यात दरवर्षी गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ठिकठिकाणी मंडप उभारले जात असून यासाठी ठाणे महापालिका, वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मंडप उभारताना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन होऊ नये यासाठी गणेश मंडळांना कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. यामध्ये मंडप उभारणीच्या अर्जासोबतच जागेचा पत्ता, ढोबळ नकाशा, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नावे आणि मंडपात फायर सिलिंडर ठेवल्याबाबतचे प्रमाणपत्र आदी सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक केले आहे.
58 गणेश मंडळांनी ऑनलाइन, तर 30 मंडळांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत. ऑफलाइन अर्ज करताना मंडळाकडे जी कागदपत्रे आहेत ती त्यांनी दिली आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना आता केवळ एकाच मंडळाला परवानगी देण्यात आल्याने गणेश मंडळांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
… तर परवानगीपूर्वीच मंडप उभारणीला सुरुवात
ठाणे शहरात अनेक नामांकित गणेश मंडळे आहेत, तर काही मंडळे वर्षानुवर्षे त्याच जागेवर गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे अशा गणेश मंडळांनी परवानगीपूर्वीच मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मंडप उभारणीच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आले असताना जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा मिळेल, आम्ही मात्र दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करणार, असा पवित्रा मंडळांनी घेतला आहे.