अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताला गळती लागल्याने पाण्याने थपथपलेल्या गाद्यांवर गर्भवतींची प्रसूती होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोग्य विभागाने पावसाळ्याआधी दुरुस्तीची कामे केली. मात्र तरीही गळती सुरूच आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृह, नवजात शिशू कक्षात पाणीच पाणी झाले आहे. तसेच ओपीडीसाठी आलेल्या आदिवासी रुग्णांची फरफट होत आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ही गळती कधी रोखणार, असा सवालही रहिवासी विचारत आहेत.
पावसाळ्यापूर्वी अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेडची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र हे काम थुकपट्टी लावून केल्याने पहिल्याच पावसात छताला गळती लागली. केंद्रातील लाद्या, भिंती ओल्याचिंब होऊन पाण्याच्या धारा लागल्या आहेत. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने प्रसूती कक्षातील बेड, गाद्या, चादरी पूर्णपणे भिजल्या आहेत. तसेच
आयुष्मान अलीग्य मंदिर औषधसाठाही भिजला आहे.
आरोग्य केंद्राची गळती थांबवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी छपरावर प्लास्टिक टाकले आहे. मात्र त्यातूनही गळती सुरूच आहे. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी याची माहिती शहापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे यांना दिली. त्यानंतर डॉ. सोनपिंपळे यांनी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी कळवले आहे. ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. छपरातून गळणारे पाणी जमिनीवर पडू नये म्हणून अनोखी शक्कल लढवत कर्मचाऱ्यांनी जागोजागी बादल्यांची रांग लावली आहे. यामुळे आदिवासी रुग्णांना जीव मुठीत धरून उपचार घ्यावे लागत आहे.