
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ए. आर. अंतुले यांच्याविरोधात रायगड लोकसभेत शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांनी निवडणूक लढवून निकराची झुंज दिली. म्हणूनच शाब्बास माझ्या वाघा.. अशी कौतुकाची थाप देत शिवसेनाप्रमुखांनी अनंत तरे यांना उपनेतेपद बहाल केले. स्वतःची स्वार्थी गद्दार कृती लपवण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे आणि अनंत तरे या दोन्ही दिवंगत नेत्यांच्या नात्यात म्हस्के विष कालवत आहेत. याच अनंत तरेंसमोर तुम्ही मदतीसाठी झोळी पसरत होतात हे विसरलात काय? असे जोरदार तडाखे तरे कुटुंबीयांनी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना आज लगावले.
धर्मवीर आनंद दिघे आणि अनंत तरे यांच्या नात्यावर नरेश म्हस्के यांनी गरळ ओकल्यानंतर तरे कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन म्हस्के यांचा जोरदार समाचार घेतला. अनंत तरे हे निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांनी लोकांकडून लुबाडले नाही तर स्वतःच्या पैशांवर राजकारण केले. त्यांच्यावर शिवसेनाप्रमुखांचा आणि धर्मवीरांचा विश्वास होता. म्हणून त्यांना तीन वेळा ठाणे शहराचा महापौर होण्याचा मान मिळाला. म्हस्के तुम्ही त्यावेळी शहरात शिकवण्या घेत फिरत होतात. अनेक वेळा तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या स्पॉन्सरशिपसाठी अनंत तरे यांच्या कार्यालयात येऊन झोळी पसरत होतात याचा तुम्हाला विसर पडला काय? धर्मवीर आणि तरे यांच्यातील नाते घनिष्ठ होते. त्यामुळे उगाचच आनंद दिघे आणि तरे यांच्या नात्यात विष कालवू नका. खासदार आहात, खासदारासारखे रहा, असेही महेश्वरी तरे यांनी यावेळी म्हस्के यांना फटकारले. याप्रसंगी ठाणे शहरप्रमुख अनिश गाढवे, संजय तरे आदी उपस्थित होते.
… तर कोळी समाज तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही
तुम्ही सरड्याप्रमाणे रंग बदलला आहे. आम्ही निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंतच राहणार आहोत. कुणाची चाटुगिरी करून आम्ही पदे मिळवली नाहीत. अनंत तरे आणि धर्मवीर यांच्या नात्यातून तुम्ही विष काल वण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे राज्यातील कोळी समाज संतप्त झाला आहे. आमच्या नादाला लागू नका, अन्यथा कोळी समाज तुम्हाला महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही महेश्वरी तरे यांनी यावेळी नरेश म्हस्के यांना दिला.