
शहरात बहुतांश ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेने रस्त्यांचे खोदकाम सुरू केले आहे. या खोदकामांमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना लांबचा फेरा मारावा लागत असल्याने मीटरचे भाडेदेखील वाढले आहे. दरम्यान, उल्हासनगरातील रस्त्याच्या खोदकामांमुळे प्रवाशांचा खिसा कापला जात आहे तर व्यापाऱ्यांचे धंदे ठप्प पडले असल्याने महापालिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
लालचक्की चौक ते छत्रपती संभाजी चौक मार्गाचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे स्टेशन ते छत्रपती संभाजी चौक मार्गावरील रिक्षा बंद होत्या. चौक येथे जाण्यासाठी रिक्षांना व्हिनसजवळील स्मशानभूमी मार्गाने किंवा दहाचाळमार्गे जावे लागत असल्यामुळे पाच रुपये भाडेवाढ करण्यात आली आहे. कॅम्प नंबर 4 मधील लालचक्की चौक ते वीर सावरकर यांच्या पुतळ्यापर्यंत ड्रेनेजच्या कामासाठी खोदकाम करण्यात आल्याने हा रस्ता अनेक महिने बंद होता. यामुळे कुर्ला कॅम्पकडे जाणाऱ्या रिक्षांना पर्यायी म्हणून भाटिया मार्ग असा लांबचा फेरा मारून जावे लागत होते. त्यामुळे पाच रुपये भाडेवाढ करण्यात आली होती.
शांतीनगर स्मशानभूमीजवळ खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका आणि चोपडा कोर्ट, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रिक्षांना लांबचा पल्ला गाठावा लागत आहे.
नागरी सुविधांसाठी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. वाहनचालकांना त्याची झळ सोसावी लागत असून वाहनांच्या लांबच्या फेऱ्या वाढल्या आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात असून नागरिकांना रस्त्यांचा नवा लूक बघायला मिळणार, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी सांगितले.



























































