मौऺथा वादळाचा तडाखा, महाराष्ट्रातील सात मच्छीमार बोटी पाच दिवसांपासून बेपत्ता

प्रातिनिधिक फोटो

अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून उठलेल्या मौऺथा वादळ आणि मुसळधार पाऊस या तडाख्यात पाच मच्छीमार बोटी बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. श्री साई समर्थ कृपा, चंद्राई, गावदेवी मरीन आणि माहुलच्या बोटी बेपत्ता आहेत. कोस्टगार्डच्या मदतीने या बोटींचा शोध घेण्याचे काम सुरू असले तरी अद्यापि त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे खलाशांच्या कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरण खराब झाले आहे. तसेच वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान विभागाने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर शनिवारपासून मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र वादळाच्या इशाऱ्यापूर्वीच शेकडो मच्छीमार बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या आहेत. अनेक मच्छीमार बोटींनी विविध बंदरातील किनारा गाठला असला तरी काही मच्छीमार बोटी अद्यापही वादळात अडकून पडलेल्या आहेत.