
शहा सेनेचे मिंधे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात भाजप आणि अजित पवार गट प्रचंड आक्रमक झाला आहे. थोरवे हे घातकी असल्याचे अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन सांगितल्यानंतर भाजपने तर थोरवेंनी आम्हाला सपशेल फसवले, असा जाहीर पंचनामा केला आहे. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोरच कशेळे ग्रामीण विभागाचे भाजपचे सरचिटणीस रामदास घरत यांनी शाब्दिक तडाखे लगावले आहेत.
मिंर्धेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हुकूमशाही कारभाराविरोधात भाजप आणि अजित पवार गटात प्रचंड खदखद आहे. अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांच्याविरोधात थोरवे यांनी प्रचंड आगपाखड केली होती. त्यावेळी घारे यांनी थोरवे कसे विश्वासघातकी आहेत याचा पाढाच पत्रकार परिषदेतून वाचला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना अजित पवार गटाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदाची घुरा सुपूर्द करत थोरवे यांना धोबीपछाड दिला.
दुसरीकडे भाजपही थोरवेंविरोधात आक्रमक झाला आहे. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्जत येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. – या बैठकीत भाजपचे कशेळे ग्रामीण विभागाचे सरचिटणीस रामदास घरत यांनी थोरवेंचे जाहीर वाभाडे काढले. निवडणुकीत आम्ही थोरवेंसाठी काम केले. त्यांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस केला, पण निवडून आल्यावर थोरवेंनी भाजप कार्यकर्त्यांचा ना सन्मान ठेवला ना त्यांना विकासकामात संधी दिली. त्यांच्या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही भाजप पदाधिकाऱ्यांना दिले जात नाही. या थोरवेंनी आमची फसवणूक केली आहे, असा संताप घरत यांनी व्यक्त केला.
…तर स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढू
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदाधिकाऱ्यांची थोरवेंविरोधात कैफियत ऐकून घेतली. ते म्हणाले, कार्यकर्त्यांचा सन्मान महत्त्वाचा आहे. भाजपची ताकद पाहता युती न झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवू, असे आश्वासन ठाकूर यांनी दिले.