
तीन दिवसांच्या नवजात बालकाला हातावर घेऊन मातेला दोन किलोमीटर जंगलातून पायपीट करत घर गाठावे लागल्याची धक्कादायक घटना मोखाडा तालुक्यात उघडकीस आली आहे. प्रसूतीनंतर घरी परतत असताना रुग्णवाहिका चालकाने मातेला अर्ध्या रस्त्यात उतरवल्याने तिची फरफट झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आरोग्य यंत्रणेचा असंवेदनशील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
केवनाळे येथील सविता बांबरे (20) या आदिवासी महिलेला 19 नोव्हेंबर रोजी प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्या सुखरूप प्रसूतीसाठी डॉक्टरांनी तिला जव्हार उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे तिची सुखरूप प्रसूती झाली. तिची व बाळाची प्रकृती स्थिर असल्याने डॉक्टरांनी 23 नोव्हेंबरला रुग्णवाहिकेत बसवून घरी पाठवले. सविता ही सासू व आईसोबत रुग्णवाहिकेतून तानसा अभयारण्यातील आमला गावात माहेरी जात असताना चालकाने रुग्णवाहिका दोन किलोमीटर लांब सूर्यमाळ गावाजवळ थांबवली. त्याने पुढे जाण्यास नकार दिला. त्यानंतर मातेने आपल्या तीन दिवसांच्या बालकाला हातावर घेतले आणि पायपीट करत घर गाठले. जागरूक नागरिक राजू बारात यांनी मातेचा हृदयद्रावक व्हिडीओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केला.
सविता बांबरे यांनी जव्हारहून केवनाळे येथे जाण्यासाठी 102 क्रमांकाची रुग्णवाहिका बुक केली होती. मात्र सूर्यमाला येथे आल्यानंतर त्यांनी आमला गावात जाण्यासाठी चालकाकडे आग्रह धरला. चालकाने त्यांना आमला गावाच्या फाट्याजवळ नेले असता त्यांनी गाडी थांबवून येथून आम्ही पायी घरी जाऊ असे सांगितल्याची माहिती रुग्णवाहिका चालकाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी सांगितले.




























































