परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अंबरनाथमधील कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा मारला आहे. या कारवाईत कॉल सेंटरच्या मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

रुद्र टेक आयटी सर्व्हिस असे या बनावट कॉल सेंटरचे नाव आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस सेंटरमध्ये तिसऱ्या मजल्यावर हे कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना कॉल करून वेबसाईट डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली संपर्क साधायचे आणि त्यांच्याकडून 100 ते 200 डॉलर अॅडव्हान्स मागवायचे. हे पैसे ते बिटकॉईन अकाऊंटमध्ये जमा करायचे. त्यानंतर अमेरिकन नागरिकाला ब्लॉक केले जात होते. याप्रकरणी कॉल सेंटरचा मालक कमलेश सचवानी याच्यासह एकूण पाच जणांना बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे.