मुहूर्त सापडला; तारीख ठरली गडकरी, रंगायतन पडदा 17 ऑगस्टला उघडणार

ऐतिहासिक ठाण्याची शान असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रंगायतन नाट्यरसिकांना खुले करण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला असून तारीखदेखील ठरली आहे. गडकरी रंगायतन नाट्यगृह सुरू करण्याविषयी ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्या पालिका प्रशासनाने रंगायतनचा पडदा 17ऑगस्टला उघडणार असल्याची पुन्हा नवी तारीख दिली आहे. दरम्यान, या नूतनीकरणाच्या कामाची पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ज्येष्ठ कलाकार, नाट्यनिर्मात्यांनी आज पाहणी केली असून काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

गडकरी रंगायतनमध्ये रंगमंच, आसनव्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रंगपट, स्टेजच्या मागची बाजू, सेटची व्यवस्था, स्वच्छतागृह यांसह अनेक नूतनीकरणाची कामे करण्यात आली आहेत. विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांसाठी गडकरी रंगायतनमध्ये प्रथमच लिफ्टची व्यवस्था करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्याबरोबर रंगायतनच्या तळमजल्यावर नाटकासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्थाही करावी, अशी सूचना आजच्या पाहणीत करण्यात आली. तसेच पार्किंग व्यवस्था, तालीम सभागृह, तिकीट खिडकी, नाटकांचे फलक लावण्यासाठी असलेली सुसज्ज जागा उपलब्ध करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त सुविधा

जुन्या वास्तूला असलेल्या मर्यादा सांभाळून शक्य तेवढ्या जास्तीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ध्वनी आणि प्रकाश योजना, रंगपट आणि बँक स्टेजला काही सुधारणा कलाकारांनी सुचवल्या आहेत. आता लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची संधी मिळू देत अशी इच्छा कलाकारांनी व्यक्त केली आहे.