
धाटाव औद्योगिक वसाहतीमधील ‘साधना नायट्रोकेम’ या कंपनीमधून पावणे दोन कोटी रुपये किंमतीच्या कॅटालिस्ट पावडरची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या चोरट्यांनी कंपनीच्या गेस्ट हाऊसमधून २३० किलो कॅटालिस्ट पावडरच्या बॅगा लंपास केल्या. पोलिसांना ही बाब समजताच कोणतेही पुरावे नसतानादेखील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने या चोरीचा पर्दाफाश केला आणि १० जणांच्या मुसक्या आवळल्या.
रोह्यातील धाटाव येथील साधना नायट्रो केमिकल कंपनीतून १ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांच्या कॅटालिस्ट पावडरची चोरी झाल्याची तक्रार विद्याधर बेडेकर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी कोणतेही धागेदोरे सापडत नसल्याने आरोपी मोकाट फिरत होते.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. यावेळी पथकाने संशयित राज रटाटे याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घराची झडती घेतली असता पथकाला पावडरचे काही सॅम्पलही मिळाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने ही चोरी साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याचे साथीदार अक्षय रटाटे, भरत मालुसरे, शुभम मोरे, ऋतिक रटाटे, दिनेश भोगटे, नितेश भोगटे, गणेश मालुसरे, किरण भगत व अनिकेत जाधव यांना बेड्या ठोकल्या आहेत.
दहा दिवस उशिरा गुन्हा दाखल
१५ सप्टेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान चोरट्यांनी कंपनीच्या गेस्ट हाऊसमधील कॅटालिस्ट पावडरच्या बॅगा लंपास केल्या होत्या. गुन्हा उघडकीस आल्यानंतर कंपनी प्रशासनाने तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर कंपनी प्रशासनाने दहा दिवसानंतर अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या चोरीची पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.

























































