पाटोळे लाचखोरी प्रकरण; एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांना इन्व्हेस्टिगेशन शब्दच उच्चारता येईना, कोर्टाने झापले

ठाणे पालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या जामिनावरील सुनावणीला पुन्हा ब्रेक लागला आहे. याप्रकरणी आज ठाणे न्यायालयात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. यावेळी एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांना इन्व्हेस्टिगेशन शब्दच उच्चारता येईना, त्यामुळे संतापलेल्या न्यायमूर्ती एस. एस. शिंदेंनी तपास अधिकाऱ्याला भरकोर्टात चांगलेच झापले. दरम्यान, उद्या एसीबीच्या अधीक्षकांना पाचारण करा, अन्यथा गांभीर्याने कारवाई करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला. यामुळे पाटोळे यांच्यासह अन्य दोघांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला असून तिघांच्याही जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे.

बिल्डरकडून २५ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुंबई एसीबीने पाटोळे यांना पालिकेच्या वर्धापनदिनी अटक केली. बुधवारी पाटोळे व त्यांच्या अन्य दोघा साथीदारांच्या जामीन अर्जावरील सुनावणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिंदे सुट्टीवर असल्याने पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आज पुन्हा न्यायालयीन सुनावणीला ब्रेक लागला. न्यायाधीश शिंदे यांनी पाटोळेच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान हे मनी लॉण्डरिंगचे प्रकरण आहे का? असा प्रश्न पाटोळे लाच प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला विचारला. त्यावर स्पष्टीकरण देताना त्या अधिकाऱ्याला इन्व्हेस्टिगेशन शब्दच उच्चारता आला नाही. त्यामुळे तपास अधिकाऱ्याला न्यायमूर्ती शिंदे यांनी चांगलेच फैलावर घेतले.

न्यायमूर्ती शिंदेंचा प्रश्नांचा भडिमार

इतक्या महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कसा करू शकतो. यांना तर इन्व्हेस्टिगेशन हा शब्ददेखील उच्चारता येत नाही, अशा शब्दात न्यायमूर्तींनी तपास अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले. फॉरेन्सिक लॅबमध्ये मोबाईल पाठवले आहेत का? मला पूर्ण डिटेल माहिती पाहिजे. तसेच व्हॉट्सअॅप कॉल हिस्ट्री बघितली का? व्हॉट्सअॅप मेसेजची चौकशी केली का? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार न्यायमूर्ती शिंदेंनी तपास अधिकाऱ्यावर केला.

व्हॉइस ऑडिओ, ठसे फॉरेन्सिक लॅबमध्ये

पाटोळे लाच प्रकरणातील पुरावे तपासण्याचे काम सुरू आहे. लाच मागताना पाटोळे यांचा व्हॉइस ऑडिओ आणि नोटांवरील ठसे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान काही दिवसांमध्ये सखोल चौकशी झाल्यानंतर पाटोळेंच्या विरोधात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी विशाल भानुशाली, समीर हाटले, जयेश तिखे हे वकील उपस्थित होते.