
ठाण्यातील शास्त्रीनगरात क्लस्टर योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बिल्डरने लोकमान्यनगर, शास्त्रीनगरातील रहिवाशांच्या खोट्या सह्या करून बनावट कागदपत्रे ठाणे पालिकेला दिल्याचा आरोप या इमारतीतील रहिवाशांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रहिवाशांना अंधारात ठेवून बिल्डरने क्लस्टरचा प्रस्ताव थेट पालिकेकडे सादर केल्याचे उघडकीस आले असून या इमारतीतील 1600 रहिवाशांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर विभागाचा पुनर्विकास गेली अनेक वर्षे रखडला आहे. क्लस्टरच्या माध्यमातून येथील इमारतींचा विकास व्हावा यासाठी 2017 पासून रहिवासी पाठपुरावा करीत आहेत. मात्र एसआरएच्या माध्यमातून पुनर्विकास करून स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी काही समाजकंटकांनी येथील रहिवाशांवर दबावतंत्र सुरू केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
रहिवाशांनी पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू केली असतानाच ओम श्री साई कन्स्ट्रक्शन नामक बिल्डरने थेट रहिवाशांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून आणि बोगस कागदपत्रे महापालिकेला देऊन या इमारतींचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रस्ताव दिला. ही बाब कळताच या इमारतींमधील 1600 रहिवाशांनी आज तातडीची बैठक घेतली आणि या घोटाळ्याचा भंडाफोड केला.
ओम श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनी कोणाची?
पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू असताना अचानक ओम श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बिल्डरने 30 एप्रिल रोजी ठाणे महापालिकेमध्ये पुनर्विकासाचा एकतर्फी प्रस्ताव दिला. यामध्ये बिल्डरने रहिवाशांना विश्वासात न घेता प्रस्ताव तयार केला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ओम श्री साई कन्स्ट्रक्शन ही कंपनी कोणाची? हा बांधकाम व्यावसायिक कोण? याचा शोध रहिवासी घेत आहेत.
स्थानिकांनी बैठकीत कोणते निर्णय घेतले
- बिल्डरने सादर केलेल्या बोगस प्रस्तावाला विरोध करतानाच रहिवासी कायदेशीर लढा लढणार आहेत.
- कायदेशीर सल्लागारामार्फत पालिका आयुक्त यांना हरकत कळविण्यात आली आहे.
- रहिवाशांना अंधारात ठेवून आणि प्रशासनाची दिशाभूल करून सादर केलेला क्लस्टर पुनर्विकासाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी रहिवाशांनी केली असून न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला.
- रहिवाशांची कोणतीही दिशाभूल होणार नाही असे त्यांना विश्वासात घेऊनच फेडरेशनच्या माध्यमातून पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.