
शौचालय तसेच नाल्याजवळ आरोग्य केंद्र उभारण्याचा शिंदे गटाचा डाव ठाण्यातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आज उधळून लावण्यात आला. नाना-नानी पार्कच्या जागेवर आरोग्य केंद्र का उभारण्यात येत आहे, यामागे उद्यानाची जागा हडपण्याचा तर डाव नाही ना, असा संतप्त सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाच्या घशात भूखंड घालू देणार नाही, असा इशारा यावेळी स्थानिक नागरिकांनी दिला.
ठाणे महापालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे यांनी प्रभाग क्रमांक 13 मधील संत ज्ञानेश्वरनगर येथील नाना-नानी पार्कच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाला दिला आहे. मात्र दुरुस्तीच्या ऐवजी नाना-नानी पार्कच्या जागेवर चक्क रातोरात आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट शिंदे गटाकडून घातला गेला. धक्कादायक म्हणजे शिंदे गटाने त्या जागेवर काँक्रीटीकरण केले तसेच रस्ताही नसताना या ठिकाणी आरोग्य केंद्र का, असा प्रश्न प्रभागातील नागरिकांनी केला. दरम्यान संतप्त नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर शिवसेना, मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोग्य केंद्राला कडाडून विरोध केला.
रातोरात काम सुरू केल्याने आश्चर्याचा धक्का
संत ज्ञानेश्वरनगर, गंगाधरनगरमधील नाना-नानी पार्कची अतिशय दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पूर्वी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकदेखील येत होते. त्यामुळे या नाना-नानी पार्कची दुरुस्ती करून ते पुन्हा नागरिकांना वापरता यावे यासाठी स्थानिक नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. खुस्पे यांच्या पत्राची दाखल न घेता प्रशासनाने नाना-नानी पार्कच्या जागेवर रातोरात आरोग्य केंद्राच्या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.





























































