
कर्नाळा – साई – चिरनेर (केएससी नवनगर) नावाने तिसरी मुंबई वसवली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केल्या जाणार आहेत. मात्र विश्वासात न घेता सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने शेतकरी संतप्त आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी आज उरण तहसील कार्यालयावर धडक देत भूसंपादनाला विरोध केला. आधी चर्चा करा नंतरच तिसऱ्या मुंबईसाठी जागा मागा, असे शेतकऱ्यांनी तहसीलदारांना ठणकावले.
शेतकऱ्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करतानाच शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यासाठी गावागावात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काही दिवसांपासून सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावण्याचे काम सुरू केले आहे. रंगाने आखलेले पट्टे पेटवून दिले जात आहेत. त्यामुळे सरकारविरोधात शेतकरी संघर्षाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर आज एमएमआरडीए केएससी नवनगरविरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उरण तहसील दार डॉ. उद्धव कदम यांची भेट घेतली.
२०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे जमीन संपादित करण्यात यावी, घरे नियमित करावीत अन्यथा तिसऱ्या मुंबईसाठी एक इंचही जमीन संपादित करू देणार नाही, असा इशारा समितीने तहसीलदारांना दिला. अडीच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मागणीला एमएमआरडीए अथवा कोणत्याही शासकीय विभागाकडून प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता भले तर गुन्हे दाखल केले तरी चालतील मात्र मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलकांनी केला. यावेळी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, संतोष ठाकूर, रुपेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
अधिकारी बनले दलाल
तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी, विक्रीच्या व्यवहारात महसूल विभागाचे अधिकारी – कर्मचारीच दलालीचे काम करत आहेत, असा आरोप एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. दलालांकडून बनावट कागदपत्रे तयार करून जमीन खरेदी, विक्रीचे व्यवहार केले जात आहेत. दलाली करणाऱ्या महसुली कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा समितीचे समन्वयक अॅड. सत्यवान ठाकूर यांनी दिला.
































































