
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात नेमकं काय चाललंय असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीला गुपचूप सीडीआर विकणाऱ्या दोन पोलिसांना अटक करण्यात आली असून हा डेटा विकत घेणाऱ्याच्याही मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या पोलिसांची नावे आकाश सुर्वे व हर्षद परब अशी आहेत. हा डेटा विकत घेणाऱ्याचे नाव मोहम्मद सोहेल मोहम्मद शब्बीर राजपूत असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान सायबर पोलीस ठाण्यातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गोपनीयतेचा भंग करणाऱ्या दोन्ही पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. डिटेक्टिव्ह एजन्सीने पोलिसांकडून घेतलेल्या सीडीआरचा कशासाठी व कुठे उपयोग केला याचा तपास आता वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.
आकाश सुर्वे हे 2014 मध्ये तर हर्षद परब हे 2018 साली पोलीस दलात भरती झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते दोघेही एकत्र ठाणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. राबोडीच्या आकाशगंगा रोड या भागात राहणारा मोहम्मद सोहेल हा सुर्वे व परब या दोघांच्याही संपर्कात आला. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्याला अनेकदा आपल्याकडील कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) विकले. त्यासाठी किती रुपयांचा व्यवहार झाला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मोहम्मद हा सराईत गुन्हेगार असून तो आकाश सुर्वे व हर्षद परब या दोन पोलिसांच्या संपर्कात कसा आला, कोणी मध्यस्थी केली याचीही चौकशी करण्यात येत आहे.
‘त्या’ प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही
मुंबईहून ठाण्यात एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या विवाहित जोडप्याला धमकावून तब्बल 50 हजारांहून अधिक रुपये उकळणे ठाणे पोलीस दलातील तिघांना चांगलेच महागात पडले होते. पोलीस शिपाई जयेश आंबिकर, राकेश कुंटे आणि सोनाली मराठे या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी अद्याप तरी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
ज्याला सीडीआरचा डेटा विकण्यात येत होता त्या मोहम्मद सोहेल याची डिटेक्टिव्ह एजन्सी असून त्याचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी तर केला गेला नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
सायबर पोलीस ठाण्यातील हा भयंकर प्रकास उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांनी पोलीस आकाश सुर्वे, हर्षद परब व मोहम्मद सोहेल या तिघांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर गुन्हे शाखा करीत आहे.



























































