सोसायट्यांना भेटी देऊन रूग्ण शोधणार, ठाण्यात ‘कोरोना’शी मुकाबला करण्यासाठी५२ खाजगी

423

‘कोरोना’ शी मुकाबला करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने ५२ खाजगी डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका डॉक्टरांच्या मदतीला हे डॉक्टर्स काम करणार असून स्वतंत्र पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील विविध सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन कुठे कोरोना चा पेशंट आढळतो काय याचा शोध घेतला जाणार असून तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार शहरातील खाजगी डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे . या डॉक्टरांची यादी देखील तयार केली असून त्यांच्यासोबत ठाणे महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत. या डॉक्टरांना कार्यक्षेत्रे नेमून दिली असून त्यांनी त्यांच्या प्रभागांमध्ये असलेल्या प्रत्येक सोसायटीवर लक्ष ठेवायचे आहे. भाईंदरपाडा, हीरानंदनी इस्टेट, पवार नगर, वर्तक नगर, समता नगर ,अंबिकानगर, विटावा, दिवा,डायघर ,आनंद कोळीवाडा, बाळकुम, पारसिक नगर, रशीद कंपाऊंड अशा विविध ठिकाणी हे वैद्यकीय अधिकारी काम करणार आहेत .

ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी तातडीने अशा प्रकारच्या खाजगी डॉक्टरांची नियुक्ती केली असून या डॉक्टरांच्या पथकाने सर्व हाउसिंग सोसायट्यांना भेटी देऊन कोणामध्ये कोरोनाची लक्षणे आहेत काय याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास तातडीने त्यांना अलगीकरण करण्यास सांगण्यात येणार आहे. आवश्यक त्या चाचण्या देखील केल्या जाणार आहेत . त्याशिवाय संबंधित संशयास्पद व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या रहिवाशांचाही शोध घेण्यात येणार असून आरोग्य विभागाचे कर्मचारी, प्रभाग समित्यांमधील कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आपापल्या प्रभागात स्तरांवर स्वतंत्र पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रोज अहवाल देणार

14 दिवस सर्वेक्षण केले जाणार असून वैद्यकीय आरोग्य अधिकारी अधिकारी त्यावर लक्ष ठेवणार आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्यांना जलद गतीने वैद्यकीय मदत कशी देता येईल यावर देखील लक्ष ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल रोज संबंधित उपायुक्तांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या