ठाण्यात एसटी बसचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही, 2 जण जखमी

ठाणे बस डेपो येथून बोरिवलीच्या दिशेने निघालेल्या एसटी बसचा अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या अपघातात एसटीच्या डाव्या बाजूच्या भागाचा चक्काचूर झाला परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास एम. एच. 14 बीटी 4489 क्रमांकाची एसटी निघाली. ही एसटी कॅडबरी सिग्नलहून माजिवाडा, घोडबंदरच्या दिशेने बोरिवलीकडे जात असताना ज्युपिटर हॉस्पिटल जवळ या एसटीने एका कंटेनरला मागून धडक दिली. या अपघातात चालक संदीप पाटील (वय – 37) आणि गीता कदम (वय – 41) या दोघांच्या दोन्ही पायाला दुखापत झाली आहे तर उर्वरित प्रवाशी आणि वाहन चालक सुखरूप आहेत. या अपघातामुळे मुंबई ठाण्याहून भिवंडी, नाशिक, कल्याण, घोडबंदर, वसई, विरार, गुजरात या दिशेने जाणाऱ्या दिशेला वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.