
घोडबंदरसह ठाण्यात रोजच वाहतुकीचा जांगडगुत्ता होत आहे. त्यामुळे दहा मिनिटांच्या प्रवासाला अनेकदा एक ते दीड तासाचा वेळ लागतो. त्यातच सोमवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असल्याने वाहतूक जाममध्ये अधिकच भर पडणार असल्याने खबरदारी म्हणून आजपासून २ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यात अवजड वाहनांना १२ तास नो एण्ट्री करण्यात आली आहे. सकाळी ५ ते ११ व सायंकाळी ५ ते रात्री ११ या कालावधीत ही बंदी असणार आहे. त्यामुळे निदान पुढील १२ दिवस ठाण्यात ट्रॅफिकचा दांडिया थांबणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील भिवंडी, कोनगाव, कल्याण, अंबरनाथ, कोपरी, कासारवडवली, वागळे तसेच नारपोली हद्दीत नेहमीच वाहतूक जाम होत आहे. घोडबंदर तसेच अन्य भागात सकाळी व सायंकाळी अनेकदा चार ते पाच तासांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. याबाबत वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारूनही ही कोंडी फुटण्याचे नाव घेत नाही. याचा फटका नवरात्रोत्सवात बसू नये याकरिता ठाणे पोलिसांनी अवजड वाहतुकीला बारा दिवस बारा तास बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत ही माहिती दिली आहे.
दुर्गाडी परिसरातही बंदी
ठाणे शहरातील कोपरी भागात मुंबई, नवी मुंबई येथून आनंदनगर चेकनाकामार्गे ठाणे शहरात येणाऱ्या दहाचाकी तसेच त्यापेक्षा मोठ्या वाहनांना आनंदनगर चेकनाका येथे बंदी करण्यात आली आहे. मुंबई, वसई, विरारच्या बाजूने येणाऱ्या वाहनांची कासारवडवलीतील गायमुख घाट येथे नो एण्ट्री केली आहे. एलबीएस रोड तसेच चिंचोटीमार्गे येणाऱ्या वाहनांनाही मॉडेला चेकनाका चिंचोटी येथे रोखण्यात येणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाने ये-जा करावी ल ागणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवामुळे दुर्गाडी किल्ला परिसरातही वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कल्याण तसेच या भागात सायंकाळी ४ ते रात्री १२ यादम्यान अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे.