ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; मॅरेथॉनच्या प्रायोजकत्वासाठी अधिकाऱ्यांची धावा ‘धाव’, प्रशासन फक्त ३० लाख देणार

एकीकडे ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना तब्बल सहा वर्षांनंतर होणाऱ्या वर्षा मॅरेथॉनचा खर्च प्रशासनाला परवडेनासा झाला आहे. या मॅरेथॉनसाठी दीड कोटींचा खर्च असून पालि केचे बजेट फक्त 30 लाखांचे आहे. त्यामुळे प्रायोजक शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची धावा ‘धाव’ सुरू झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली ठाणे वर्षा मॅरेथॉन ही गेल्या सहा वर्षांपासून घेण्यात आली नव्हती. यंदाची मॅरेथॉन स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. महासभा अस्तित्वात नसल्याने वर्षा मॅरेथॉन असे नाव ठेवण्यात आले असून या स्पर्धेत तब्बल 10 लाख 38 हजार 900 रुपयांची पारितोषिके, चषक व पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये देशविदेशातील तसेच विविध राज्यातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर धावणार आहेत.

स्पर्धेसाठी राजकीय नेत्याचा घाट

यंदाची 31 वी वर्षा मॅरेथॉन ही सहा वर्षांच्या खंडानंतर प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. दरम्यान, आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही स्पर्धा झालीच पाहिजे असा घाट एका राजकीय नेत्याने घातला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, लाखोंच्या बक्षिसासाठी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुंपले असल्याचे समोर आले आहे.

  • गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कोणत्याही गोष्टीवर खर्च करताना पालिका प्रशासनाला हात आखडता घ्यावा लागत आहे.
  • मॅरेथॉन स्पर्धेसाठी 30 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे 30 लाख बक्षिसापोटीच खर्च होण्याची शक्यता आहे, तर इतर सर्व खर्च मिळून सवाकोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
  • स्पर्धेसाठी होणारा सर्व खर्च प्रायोजकांच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी पत्रव्यवहारदेखील करण्यात आला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वस्वी प्रायोजकांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.