मध्य रेल्वेची एसी लोकल 29 जानेवारीपासून धावणार, ठाणे ते वाशी-पनवेल मार्गावर शुभारंभ

1615

मध्य रेल्वेच्या  ठाणे ते वाशी-पनवेल मार्गावर अखेर वातानुकूलित लोकलच्या फेर्‍यांना येत्या बुधवार 29 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मुंबई उपनगरीय लोकलच्या विविध सोयीसुविधांचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकललाही हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर सरत्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातून वातानुकूलित लोकल दाखल झाली आहे. या लोकलच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून ती आधी 24 जानेवारी रोजी चालविण्याचे नियोजन होते. परंतु त्या दिवशी मुंबईत मोर्चा असल्याने आता ही लोकल 29 जानेवारीस रेल्वे राज्य मंत्र्यांच्या हस्ते चालविण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मध्य रेल्वेची बुटकी लोकल!

मध्य रेल्वेला खरे तर देशातील पहिली एसी लोकल मिळाली होती. परंतु दादरपुढील ब्रिटिशकालिन पुलांच्या उंची एसी लोकलला अडथळा ठरली, त्यामुळे ही एसी लोकल पश्चिम रेल्वेला मिळाली. आता ‘भेल’ कंपनीने खास मध्य रेल्वेसाठी कमी उंचीची एसी लोकल तयार केली आहे. तिची उंची 13 मि.मी.ने कमी केली आहे.

एसी लोकलच्या 16 फेर्‍या

ठाणे ते वाशी-पनवेल मार्गावर एसी लोकलच्या दिवसभरात 16 फेर्‍या होणार आहेत. या मार्गावरील जुन्या रेट्रोफिटेड डीसी-एसी लोकल हटविण्यात येणार आहेत. एसी लोकलच्या मध्ये दोन्ही टोकांना लेडीज डबा आरक्षित ठेवण्यात येणार असून महिला आरपीएफ पोलीस तैनात करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच या मार्गवर दगडफेक होऊ शकणार्‍या संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

एसी लोकलचे भाडे

ठाणे ते वाशी – 130 रुपये

ठाणे ते पनवेल – 175 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या