ठाणे पालिकेची घागर उताणी रे… कळव्यात आक्रोश

गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची कळव्यात आक्रोश टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात करण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस अघोषित पाणीबाणी असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दरम्यान ठाणे पालिकेची घागर उताणी झाली असून कळव्यात आक्रोश पाहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी आज पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले.

ठाण्याची लोकसंख्या 25 लाखांवर पोहोचली आहे. शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे.

वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आल्याने पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. त्यातच कळव्याला होणारा पाणीपुरवठा आता ठाण्यात वळवण्यात आला असल्याने कळवा, खारेगाव, विटावा, डोंगरातील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढेसुद्धा पाणी पालिकेकडून देण्यात येत नाही. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले. स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला.

प्रभाग समितीसमोर मडके फोडून निषेध

जे पाणी सोडण्यात येत आहे ते गढूळ स्वरूपाचे आहे. पाण्याचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. आंदोल कांनी रिकामे हंडे घेऊन पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच प्रभाग समितीसमोर मडके फोडून निषेध केला.

एकीकडे ठाण्यात उड्डाणपुलांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र पाण्यासारखी मूल भूत गरज जर ठाणे महापालिकेला भागवता येत नसेल तर कसे होणार? ठाण्यात जास्त पाणी दिले जात असेल आणि कळव्याला पाणी दिले जात नसेल तर फक्त ठाण्यातच माणसे राहतात का, असा सवाल नताशा आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.