
विभागीय चौकशी थांबवण्यासाठी तसेच सेवानिवृत्तीनंतरचे पैसे मिळवून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. शिक्षण विभाग कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी शंकर आरे आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत खंडागळे अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तक्रारदार यांची विभागीय चौकशी सुरू आहे. ही चौकशी बंद करण्यासाठी तसेच सेवानिवृत्तीनंतरचे पैसे मिळवून देण्यासाठी शंकर आरे आणि श्रीकांत खंडागळे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली. यातील काही रक्कम तक्रारदाराने या आधीच अधिकाऱ्यांना दिली होती. तर उर्वरित २० हजार रुपयांची अधिकारी मागणी करत होते. याबाबत तक्रादार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोघांनाही पकडले.
भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
श्रीकांत खंडागळे यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत सुरू असलेला भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.
























































