ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा लोणे तर उपाध्यक्षपदी सुभाष पवार यांची बिनविरोध निवड

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्षपदी सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. एन.के.टी. कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) तथा सभा सचिव छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणूकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा पदावधी 15 जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले. ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या