
नववर्षाची सुरुवात साहित्याचा जागर आणि ग्रंथदिंडींच्या जयघोषात होणार आहे. ऐतिहासिक सातारा नगरीत 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. या निमित्ताने चार दिवस साताऱ्यात सारस्वतांचा मेळा रंगणार आहे. ‘पानिपत’कार विश्वास पाटील संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तब्बल 33 वर्षांनंतर भूमीत संमेलन होत असल्याने सातारा नगरीत उत्साह आहे. हे शतकपूर्व संमेलन असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन यांच्या वतीने नववर्षाच्या प्रारंभीच म्हणजे 1 ते 4 जानेवारी दरम्यान शाहू स्टेडियम येथे पार पडत आहे. त्याची सुरुवात गुरुवारी दिमाखदार ग्रंथदिंडीने होईल. संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून सातारा नगरी सजली आहे. साहित्यिक व साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी जिह्याच्या हद्दीपासून महामार्गावर भव्य फलक उभारण्यात आले आहेत. संमेलनाचे नाव आणि बोधचिन्ह दर्शविणारा आकाशफुगाही मोठय़ा दिमाखाने आकाशात विहरत असून सातारकरांचे लक्ष वेधून घेत आहे
सातारी भोजनाचा बेत
शतकपूर्व संमेलनान अनेक नव्या संकल्पना आणि रिती अनेक नवनवीन संकल्पना घेऊन येत आहे. नव्या रितीरिवाजांचे पायंडेही पाडत आहे. संमेलन सर्वोत्तम व्हावे याकरिता आयोजकांसह सातारकर प्रयत्न करत आहेत. अस्सल सातारी भोजनाचा आनंद उपस्थितांना घेता येईल. विशेष निमंत्रित साहित्यिकांना चांदीच्या ताटात भोजन देऊन त्यांची खास बडदास्त ठेवण्यात येईल.
z 99वे साहित्य संमेलन शहराच्या मध्यवर्ती भागातील 14 एकरात असलेल्या छत्रपती शाहू स्टेडियम येथे होत आहे. याच स्टेडियमवर 1993 साली 66 वे संमेलन दिमाखात साजरे झाले होते. हा मोठा योगायोग आहे.
z मुख्य मंडपासह ग्रंथ प्रदर्शन, कवी-गझल कट्टा यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत. इतर तीन सभागृहांमध्येही विविध साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
z मुख्य मंडपाची आसन क्षमता सुमारे दहा हजार असून ग्रंथप्रदर्शनासाठी नऊ फूट बाय नऊ फूट आकाराचे जर्मन हँगरचे 254 गाळे उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संमेलनाच्या मुख्य मंडपात ग्रंथदालनातूनच जावे लागणार असल्याने हाही परिसर साहित्य प्रेमींच्या गर्दीने फुलून जाणार आहेत.
जिह्याची ओळख सांगणाऱ्या उपक्रमांची रेलचेल
सारस्वतांच्या या उत्सवात सातारा जिह्याची ओळख दर्शविणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिह्याचे भौगोलिक महत्त्व अधोरेखित करत मराठी भाषा, मराठी बाणा, भाषेच्या संघर्षाचे, मराठय़ांच्या राजधानीचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवत सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक योगदानाचे प्रतिबिंब दर्शविणारे ‘हे शतकपूर्व संमेलन सातार्ययाचे’ संमेलन गीत तयार केले आहे. जिह्यातील एकूण 55 शाळा व महाविद्यालयांसह शिक्षण विभागातून प्रत्येक तालुक्याचा एका याप्रमाणे 11 व जिल्हा परिषदेचा एक चित्ररथ असणार आहे. संमेलनाच्या अनुषंगाने ‘सातारा आणि अटकेपार’ अशा साम्राज्याचा विस्तार आणि पराक्रमाची आठवण करून देणारी ‘अटकेपार’ ही स्मरणिका तयार करण्यात आली आहे. हे संमेलन सर्वांसाठी खुले असून, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.





























































