
मिठी नदीची साफसफाई झाली नाही तर मुंबई जलमय होईल अशी हरकत स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान नोंदवण्यात आली होती. या हरकतीनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवत कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदारांमार्फत 4 एप्रिलपासून मिठी नदीच्या साफसफाईला सुरुवात होणार आहे.
18 मार्च रोजी स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत मिठी नदीची सफाई झाली नाही तर मुंबई जलमय होईल, असा आरोप केला. त्यांच्या हरकतीच्या मुद्दय़ावर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्थायी समितीत मिठी नदीच्या सफाईचे सादरीकरण केले. त्यानंतर दोन कंत्राटदारांनी निविदेला प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून 4 एप्रिलपासून मिठी नदीतील गाळ उपसा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.



























































