
रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या लोको आणि ट्रफिक रनिंग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरून असंतोष वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन उदासीन आहे. या पार्श्वभूमीवर रेल कामगार सेनेने कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर भूमिका घेतली आहे. लोको पायलटच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, असा इशारा रेल कामगार सेनेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
रेल्वेमध्ये काम करणारे लोको पायलट, ट्रेन मॅनेजर विविध प्रश्नांनी त्रस्त झाले आहेत. अतिरिक्त डय़ुटी, सलग आठवडाभर रात्रपाळी, साप्ताहिक सुट्टय़ा आणि रजा मंजुरीमध्ये अडचणी, महागाई भत्त्याच्या प्रमाणात मायलेज रेटमध्ये वाढ, रनिंग रूमच्या समस्या, स्पाडअंतर्गत कारवाई, व्हीआरएस न देणे, पदोन्नतीमध्ये अनियमितता, रनिंग स्टाफवर अन्याय आदी प्रश्नांना कर्मचारी तोंड देत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ रेल्वे कर्मचाऱयांच्या प्रश्नांवर दिल्लीत आवाज उठवणार आहे. यासंदर्भात मंगळवारी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांची भेट कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या सूचनेनुसार घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने दिल्लीला जाऊन शिवसेना नेते– खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या सीईओंची भेट घेण्याचे चर्चेदरम्यान ठरविण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते, रेल कामगार सेना सरचिटणीस दिवाकर देव (बाबी), केंद्रीय उपाध्यक्ष किशोर सोनवणे, डिव्हिजन अध्यक्ष चंद्रकांत विनरकर, सचिव तुकाराम कोरडे उपस्थित होते.





























































