
फॅशन शो म्हटलं की झगमगाट, ग्लॅमर, ऐटीतला रॅम्प वॉक आणि टाळ्यांचा कडकडाट असं वातावरण डोळ्यांसमोर येतं. कोरोना काळात प्रत्यक्षात फशन शोंचे आयोजन करता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने व्हर्च्युअल फॅशन शो होत आहेत. मात्र आता जगभरात असे शो फायदेशीर ठरताना दिसत आहेत.
फॅशनच्या जगतात सध्या व्हर्च्युअल फॅशन शोची फॅशन दिसून येत आहे. असे शो फिजिटकल आणि डिजिटल अशा मिश्र स्वरूपात आयोजित केले जाऊ लागले आहेत. त्याला ‘फिजिटल’ असे नाव देण्यात आले आहे. फॅशन डिझायनर कॉन्सिल ऑफ इंडियाने (एफडीआयसी) यंदा इंडिया फॅशन वीक फिजिटल स्वरूपात आयोजित केला. त्या वेळी सर्व मॉडेल्सना एफडीसीआयच्या कॅम्पसमध्ये एकत्रित बोलावण्यात आले. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत त्यांचा रॅम्प वॉक झाला. काही अतिथींनी कारमध्ये बसून सुरक्षित अंतराचे नियम पाळून शोचा आनंद घेतला. मात्र अधिकतर डिझायनर्सनी व्हिडियो पाठवून फॅशन शोमध्ये सहभाग घेतला.
टाळ्या-रॅम्प वॉक यांना सगळे ‘मिस’ करत असले तरी व्हर्च्युअल शोमुळे फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, कोरियोग्राफर, संगीतकार, मॉडेल्स यांना काम मिळत आहे.
हा तर न्यू नॉर्मल
व्हर्च्युअल शो आता न्यू नॉर्मल आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही व्हर्च्युअल फॅशन शो होत राहतील. पुढील महिन्यात आमचा इंडिया काउचर वीक फॅशन शो याच पद्धतीने आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती फॅशन डिझायनर कॉन्सिल ऑफ इंडियाचे सुनील सेठी यांनी दिली.
नेमकं काय होतं…
- व्हर्च्युअल शोमध्ये ड्रेस डिझायनरला आपल्या ड्रेसनुसार मॉडेल शोधावे लागतात. कॅमेरामन आणि कोरियोग्राफरच्या मदतीने शूटिंग करावे लागते. त्यानंतर हे शूटिंग आयोजकांना पाठवावे लागते.
- एका छोटय़ा जागेतही एक किंवा एकापेक्षा अधिक मॉडेल्सचे शूटिंग केले जाते.
- डिझायनरकडून शो केस रीळ आल्यानंतर पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू होतं. म्हणजे व्हिडियोंना पार्श्वभूमी, प्रकाशयोजना, ध्वनी, संगीत यांची जोड दिली जाते.
- हा फॅशन शो सोशल मीडिया आणि अन्य फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत पोहोचवता येतो.


























































