
दाभाडे घराण्यात जन्मलेले खंडेराव दाभाडे यांच्याशी उमाबाईंचा विवाह झाला. पुण्यानजीक तळेगाव हे दाभाडे घराण्याचे वतनाचे गाव होते. खंडेराव हे मराठा साम्राज्याचे सरदार होते, त्यांच्या अनेक अतुलनीय कामगिरीनंतर त्यांना शाहू राजांकडून सेनापती घोषित केले गेले. पुढे परिस्थितीमुळे घराणे व वतन दोन्ही वाऱयावर आले. अशावेळी उमाबाई दाभाडे या मराठ्यांच्या पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. उमाबाईंच्या या निर्णयाला सगळ्यांचेच समर्थन होते असे नाही मात्र विरोध होऊनही उमाबाईंनी आपले वर्चस्व टिकवून ठेवले. या लढ्यात उमाबाईंना साथ मिळाली ती म्हणजे छत्रपती ताराराणींची. सलोख्याचे सर्व प्रयत्न व विनंत्या धुडकारून लावल्याने उमाबाईंनी पेशव्यांविरुद्ध लढाईचा मार्ग स्वीकारला. 28 नोव्हेंबर 1753 रोजी नाडगेमोडी, पुणे येथे उमाबाईंचा मृत्यू झाला. आजही तळेगाव येथे त्यांची समाधी आहे. पेशव्यांशी लढण्यात त्यांना यश आले नाही पण संकटाना मात देत आपल्या पतीच्या पश्च्यात उमाबाईंनी जवळजवळ 20 वर्षे आपली सत्ता सांभाळली.




























































