शहरांतील टेकड्या बनल्या आहेत लुटारूंचे अड्डे बाणेर टेकडीवर तरुणींना मारहाण

शहरासह उपनगरांजवळील टेकड्या सातत्याने लुटमारीचे अड्डे बनले जात असल्याचे दिसून आले आहे. ‘मॉर्निंग वॉक’ सह संध्याकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या तरुण-तरुणींना टार्गेट करून टोळक्याकडून लुटले जात आहे. त्यामुळे टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह तरुणांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, बोपदेव घाट परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच, विविध टेकड्या फिरण्यासाठी सुरक्षित नसल्याचे अधोरेखित झाले आहे.

बाणेर टेकडी परिसरातही दोघा तरुणींना मारहाण करून जखमी करीत लुटले आहे. टोळक्याने त्यांच्याकडून 51 हजारांचा ऐवज काढून नेल्याची घटना 13 ऑक्टोबरला संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे याप्रकरणी तरुणीने चतुः शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही 13 ऑक्टोबरला संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास मित्रासोबत बाणेर टेकडीवर फिरायला गेली होती. त्यावेळी चौघाजणांनी त्यांना अडवून लोखंडी शस्त्राने मारहाण करून जखमी केले. त्यांच्याजवळील 51 हजारांचा ऐवज काढून घेत चोरटे पसार झाले आहेत.

सेनापती बापट रस्त्यानजीक टेकडीवर लुटीचा घटना ताजी
मध्यवर्ती सेनापती बापट रस्त्यावरील टेकडीवर दोघा तरुणांना लुटल्याची घटना घडली आहे. दोघा कोयताधारी चोरट्यांनी तरुणांना धाक दाखवून त्यांच्याकडील 70 हजारांची सोन्याची चेन चोरून नेली आहे. ही घटना 5 ऑक्टोबरला दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी साईराज भांड (वय 19, रा. नाना पेठ) याने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. साईराज आणि त्याचा मित्र अथर्व दिड्डी हे 5 ऑक्टोबरला दुपारी पावणेतीनच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावरील हनुमाननगर टेकडीजवळ मित्राची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आलेल्या दोघा शस्त्रधारी चोरट्यांनी साईराजकडील 70 हजारांची सोनसाखळी चोरून नेली.

टेकड्यांवर यापूर्वीही लुटमारीच्या घटना
तळजाई टेकडी, हनुमान टेकडी, पर्वती, पाषाण रस्ता, गोखलेनगर परिसरातील टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अंधार पडताच टोळक्यांकडून पादचाऱ्यांसह फिरणे आणि व्यायामाला आलेल्यांची अडवणूक केली जाते. त्यांच्याकडील रोकड, मोबाईल, सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले जात आहेत. त्याशिवाय तरुणींची छेडछाडीच्या घटनांही यापूर्वी घडल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी असे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनी टवाळखोरांसह गुन्हेगारांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.