
>> राजेंद्र उंडे
गोहत्या बंदीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असतानाच, डोंगरगण घाटात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी (डोंगरगण घाट) येथे गोवंशीय जातीची जनावरे सोडली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
घाटातील पहिल्या वळणाजवळ अज्ञात शेतकरी संकरित वासरे आणून सोडत आहेत. अन्न-पाण्याअभावी ही वासरे जीवाच्या आकांताने ओरडत असून, हे दृश्य पाहून वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गोहत्या बंदीमुळे संकरित गाय-वासरे कसाईखान्याकडे नेण्यावर निर्बंध आले आहेत; पण त्यांच्या संगोपनासाठी शासनाकडे कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गोहत्या बंदीमुळे शेतकरी नाईलाजाने वासरे डोंगरदऱयात सोडून देत आहेत. यावर उपाय म्हणून अनुदानित गोशाळा उभारून शेतकऱयांना अधिकृतपणे वासरे तिथे सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनांकडून होत आहे.
राज्यात असलेल्या अनेक गोशाळा केवळ अनुदान मिळवण्यासाठीच सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. तसेच भाकड पशुधन आणि गोऱहे दाखल करून घेण्यास गोशाळांकडून सर्रास नकार दिला जात असल्याचे वास्तवदेखील समोर येत आहे. डोंगर भागात सोडलेली वासरे बिबटय़ांची शिकार ठरत असून, आता गावांतील गोठय़ांवरही बिबटय़ांचे हल्ले वाढू लागले आहेत. गोहत्या बंदीमुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीची प्रशासन आणि शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत असून, अन्यथा अमानुष घटना आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





























































