
सातारा जिह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, जिह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या मध्यम सरी कोसळत आहेत. पश्चिम भागातील सह्याद्रीतील विविध घाटरस्त्यांत दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असून, यंत्रणेच्या माध्यमातून युद्धपातळीवर या दरडी हटवून रस्ते वाहतूक सुरळीत केली जात आहे.
जिह्यात मंगळवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी असला, तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह एकूणच महाबळेश्वर, पाटण तालुक्यात संततधार कायम आहे. सातारा ते कास मार्गावर सांबरवाडीजवळ कोणत्याही क्षणी कोसळेल आणि त्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ शकेल असा मोठा खडक, दरड असल्याचे पत्रकारांनी जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तो मोठा धोकादायक खडक फोडून धोका नाहीसा करण्याचा आदेश तत्काळ दिला आहे. ती कार्यवाही सोमवारी होणार असल्याने रविवारी मध्यरात्री बारा ते सोमवारी मध्यरात्री बारापर्यंत सातारा ते यवतेश्वर कास मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा, तसेच कोरेगाव तालुक्यात एखाद-दुसरी सर वगळता, ढगाळ वातावरणावरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे या भागात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. सह्याद्रीलगतच्या पट्टय़ातील
वाई, सातारा, कराड तालुक्यांमध्येही अद्यापि समाधानकारक पाऊस नाही.
कोयनेत 2.64 टीएमसीने वाढ
दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत कोयनानगरला 113, नवजाला 140, तर महाबळेश्वरला 127 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद 29 हजार 338 क्युसेक पाण्याची आवक होत असून, पाणीसाठय़ात 24 तासांत 2.64 टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणात 44.14 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धोम-बलकवडीचे दरवाजे उघडले
सातारा जिह्यातील धोम-बलकवडी धरणाचे तीनही दरवाजे शनिवारी सायंकाळी सहा वाजता अर्धा मीटर उघडण्यात आले. आता धरणातून 870 व वीजगृहातून 330 असा एकूण 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धरणाखालील बलकवडी, परतवडी, कोढवली, नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावांतील ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
























































