चौकशी अधिकाऱ्याचीच नाट्यमय पदोन्नतीने बदली; ‘गोकुळ’चे नियमबाह्य जाजम-घड्याळ खरेदी दाबण्याचा प्रयत्न

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडून जाहीर निविदा न काढताच, तब्बल पावणेचार कोटींच्या जाजम व घडय़ाळ खरेदीप्रकरणी नियुक्त केलेल्या सांगलीच्या चौकशी अधिकऱ्यांचीच आता नाटय़मयरीत्या पदोन्नतीने साताऱ्याला बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या चौकशीचे गुढ अधिक वाढले असून, सत्तेच्या जोरावर कायद्याच्या पळवाटा काढून हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, पदोन्नती झालेले चौकशी अधिकारी सदाशिव गोसावी यांना आता पुन्हा ही चौकशी करायची असेल तर त्यासाठी साखर आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी कधी मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे दुसरा अधिकारी चौकशीसाठी नियुक्त करण्याची शक्यता असून, त्यासाठीही वेळ मारून नेण्याचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे.

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गोकुळ दूध संघाकडून जिह्यातील प्राथमिक दूध संस्थांना जाजम व घडय़ाळ भेट म्हणून देण्यात आले.कोणतीही जाहीर निविदा न काढताच, कार्यकारी संचालकांनी पावणेचार कोटींची नियमबाह्य खरेदी केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी गोकुळ दूध संघाकडे केली होती.समर्पक खुलासा न आल्याने दुग्ध उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आली. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे याप्रकरणी सांगलीचे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था वर्ग-2 (पदूम)चे सदाशिव गोसावी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली. याप्रकरणी तत्काळ चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिना झाला तरी काहीच हालचाल होत नसल्याने उपनेते संजय पवार यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देताच, पुन्हा चौकशी करण्याच्या हालचाली झाल्या. मात्र, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे समोर आले.

अखेर तीन-चार दिवसांपूर्वी मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे कालपासून (दि. 24) चौकशीला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असे सांगण्यात येत होते. पण अचानक नाटय़मयरीत्या चौकशी अधिकारी गोसावी यांचीच पदोन्नतीवर बदली झाल्याचे समोर आले. त्यात गोसावी यांनी ‘गोकुळ’कडे जाजम व घडय़ाळ खरेदीबाबत खुलासा मागितला होता, त्यालाही दहा दिवस झाले आहेत. अद्याप ‘गोकुळ’कडून प्रतिसादच मिळालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता सत्तेच्या जोरावर ‘गोकुळ’मधील नियमबाह्य जाजम व घडय़ाळ खरेदीप्रकरण कायद्याच्या पळवाटा काढून पद्धतशीरपणे दाबण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.