
मुंबईत 5 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे मलबार हिल टेकडीचा काही भाग कोसळून केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल आणि रस्त्याचे नुकसान झाले होते. मात्र, या उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण झाली असून आता हा उड्डाणपूल गुरुवार 15 ऑक्टोबरपासून खुला होणार आहे. त्याचबरोबर टेकडी आणि रस्त्याचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबईत 5 ऑगस्टला अतिवृष्टी झाल्यामुळे मलबार हिल टेकडीचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गावरील रस्त्याला मोठया भेगा गेल्या तर उड्डाणपुलाच्या एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण पेडर रोड-मलबार हिल टेकडीचा भाग पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी महापालिकेने तातडीने या भागाची पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घेतले. या कामासाठी आयआयटी, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक तज्ज्ञ समितीदेखील नेमली. या अनुषंगाने या रस्त्याची, पुलाची व तेथे सुरू असलेल्या कामांची अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू, पोलीस अप्पर आयुक्त (वाहतूक) पडवळ, महापालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा) संजय दराडे यांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणी दरम्यान संबंधित तज्ज्ञांशी/अभियंत्यांशी चर्चा करून केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महापालिकेच्या पूल खात्याने दिली आहे.
टेकडी, रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी निविदा
टेकडी आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामाच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीमध्ये ख्यातनाम संरचनात्मक सल्लागारांसह भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचाही समावेश आहे. या कामासाठी महापालिकेने एका तज्ज्ञ सल्लागार संस्थेचीही नेमणूक केली आहे. तांत्रिक तज्ज्ञ समितीने व तांत्रिक सल्लागार यांनी सादर केलेली संकल्पचित्रे व निविदा सूचना प्रकाशित झालेल्या आहेत. या निविदा प्रक्रियेअंती डिसेंबर 2020 मध्ये ‘मलबार हिल’ परिसरातील या टेकडीची पुनर्बांधणी व दरडीमुळे नुकसान झालेल्या न्यायमूर्ती सीताराम पाटकर रस्त्याची पुनर्बांधणी ही कामे सुरू होण्याचे प्रस्तावित आहे.

























































