मान्सूनने संपूर्ण हिंदुस्थानातून घेतला काढता पाय; हवामान खात्याने केले जाहीर

परतीच्या वाटेवर असताना मुंबई-महाराष्ट्राला झोडपून काढलेल्या मान्सूनने अखेर मंगळवारी संपूर्ण देशभरातून काढता पाय घेतला आहे. हवामान खात्याने नैऋत्य मान्सूनच्या ‘एक्झिट’वर शिक्कामोर्तब केले आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मुक्कामी राहून मान्सून माघारी परतला. आता ऑक्टोबरच्या उर्वरित दिवसांत नागरिकांना ‘ऑक्टोबर हिट’चे चटके सोसावे लागणार आहेत.

मंगळवारी एकीकडे नैऋत्य मान्सूनने एक्झिट घेतली, त्याचवेळी दुसरीकडे ईशान्य मोसमी पाऊस दक्षिण-पूर्व द्वीपकल्पीय हिंदुस्थानात दाखल झाला आहे. हा ईशान्य मान्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या तसेच देशाच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्यातील ज्येष्ठ तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.