
घाटकोपर ते वर्सोवा यादरम्यान धावणाऱ्या मुंबईतील पहिल्या ‘मेट्रो वन’ मार्गिकेवर प्रवाशी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो प्रशासनाने विशेष नियोजन सुरू केले आहे. अंधेरी, घाटकोपर, मरोळ नाका यांसारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर मर्यादित प्रवाशांना एंट्री दिली जात आहे.
‘मेट्रो वन’ मार्गावर सद्यस्थितीत कार्यालयीन कामकाजाच्या दररोज 5 लाखांहून अधिक प्रवाशी प्रवास करतात. या मेट्रो मार्गिकेला भुयारी मेट्रो, मेट्रो-2ए आणि मेट्रो-7 अशा तीन मेट्रो मार्गिकांची कनेक्टिव्हिटी झाल्यापासून ‘मेट्रो वन’ मार्गावरील प्रवाशी संख्येत मोठी वाढ झाली आहे. घाटकोपर, मरोळ नाका, गुंदवली, अंधेरी, आझाद नगर या मेट्रो स्थानकांवर सकाळी आणि सायंकाळी प्रचंड गर्दी होत आहे. त्या गर्दीचे विशेष नियोजन करीत मेट्रो प्रशासनाने विविध पावले उचलली आहेत. त्यानुसार गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मर्यादित प्रवाशांनाच एंट्री दिली जात आहे. गर्दी वाढली की ट्रेनची आसन क्षमता विचारात घेऊन प्लॅटफॉर्मवरील एंट्री मर्यादित ठेवली जात आहे. प्लॅटफॉर्मवरचे प्रवाशी स्थानकातून प्रवास सुरू करेपर्यंत उर्वरित प्रवाशांना तिकीट काउंटर असणाऱ्या क्षेत्रात थांबवून ठेवले जाते. काही वेळेला दोन्ही क्षेत्र गर्दीने फुल्ल झाल्यानंतर अनेक प्रवाशांना ‘अनपेड’ क्षेत्रात थांबवून गर्दीचे नियोजन केले जाते, अशी माहिती मेट्रोच्या सूत्रांनी दिली.
‘पीक अवर्स’ला अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात
इतर मेट्रो मार्गिकांच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनप्रमाणेच स्वयंचलित गेट आहेत. ‘मेट्रो वन’वर तसे स्वयंचलित गेट नसल्यामुळे गर्दीच्या वेळी सुरक्षा यंत्रणांची कसोटी लागते. अशा वेळी ट्रेन येईपर्यंत प्रवाशांची गर्दी पिवळ्या रेषेच्या आत रोखून ठेवण्यासाठी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त सुरक्षारक्षक ठेवण्यास सुरुवात केली आहे.




























































