वृद्ध आईला प्रत्येकी 20 हजारांची नुकसानभरपाई द्या; न्यायालयाचे मुले आणि सुनेला आदेश

तिन्ही मुलांनी व एका सुनेने प्रत्येकी 20 हजार रुपये नुकसान भरपाई वयोवृध्द आईला देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. मोताळे पोरे यांनी आज दिले. ही मुले व सून वयोवृद्ध आईचा संभाळ करीत नव्हती. सुनावणीअंती न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, मुलांनी ही रक्कम 14 दिवसांच्या आत न्यायालयात जमा करावी. तसेच न्यायालयाने सर्व मुलांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक बंधपत्रावर एक वर्षाच्या चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर मुक्त केले.

स्वामी विवेकानंद नगर येथील रहिवासी जयश्री एकनाथ खोतकर (65) या आपला मुलगा संदीप एकनाथ खोतकर (35), सून रुपाली संदीप खोतकर (25), अन्य मुले सचिन (34) व सुनील (32) यांच्यासोबत रहातात. जयश्री खोतकर यांना मुळव्याध आणि रक्तदाबाचा विकार आहे. फिर्यादीनुसार त्यांची मुले त्यांचा व्यवस्थित सांभाळ करीत नव्हते. त्यांना खाण्यापिण्यास देत नसत. वारंवार घराबाहेर काढत. पुन्हा घरात आल्यास मारहाण करण्याची धमकी देत. हा सर्व त्रास त्या मुकाट्याने सहन करीत.

3 मे 2019 रोजी त्यांना मुळव्याधीचा त्रास होत असल्याने त्यांनी आपल्या मुलांना दवाखान्यात घेवून जाण्याविषयी बोलल्या. परंतु मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना खाण्यापिण्यास दिले नाही, धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली व आम्ही तुला सांभाळणार नाही असे म्हणत घराबाहेर काढून दिले.

तेव्हा त्यांना त्यांची मुलगी सुनीता शिरसाठ हिने दवाखान्यात नेले व औषधोपचार केला. यानंतर त्यांनी आपल्या मुलांविरुध्द तक्रार दिली. त्याआधारे सिडको पोलीस ठाण्यात तिन्ही मुले व सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील अशोक घुगे यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने चौघांना दोषी ठरवले. वरील प्रमाणे शिक्षा ठोठवत. चौघांची चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर ५० हजारांच्या वैयक्तिक बंधपत्रावर सुटका केली.