यूपीएससी सेवेत वारंवार परीक्षा देण्याचा मार्ग बंद; आयएएस, आयएफएसला पुन्हा परीक्षेला बसता येणार नाही, आयपीएससाठीही कडक नियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूपीएससी सेवेत वारंवार परीक्षा देण्याचा मार्ग बंद; आयएएस, आयएफएसला पुन्हा परीक्षेला बसता येणार नाही, आयपीएससाठीही कडक नियम

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2026 च्या नागरी सेवा परीक्षेची (सीएसई) अधिसूचना बुधवारी जारी केली. यंदा परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार, यूपीएससी सेवेत असताना वारंवार परीक्षा देण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. आता आयएएस अथवा आयएफएस असलेल्यांना पुन्हा परीक्षा देता येणार नाही. तसेच आयपीएसचे नियमही अधिक कठोर अन् स्पष्ट करण्यात आले आहेत.

एखाद्या उमेदवाराची आयपीएससाठी निवड आधीच झाली असेल, तर तो उमेदवार सीएसई 2026 च्या माध्यमातून पुन्हा आयपीएससाठी पात्र ठरणार नाही. त्याशिवाय सेवेत असणारे आयएएस आणि आयएफएस अधिकारी यापुढे या परीक्षेला बसण्यास अपात्र असतील. एखाद्या उमेदवाराची मुख्य परीक्षेपूर्वी या सेवांमध्ये नियुक्ती झाली तर त्याला मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्याची 2026 मध्ये आयपीएसमध्ये निवड झाली, तर तो 2027 मध्ये कामगिरी सुधारण्यासाठी परीक्षा देण्यास पात्र असेल. त्यानंतर जर त्याला परीक्षा द्यायची असेल, तर त्याला सेवेतून राजीनामा द्यावा लागेल.

फेस ऑथेंटिकेशनवर भर
यंदाच्या अर्ज प्रक्रियेत आयोगाने उमेदवारांच्या पह्टोबाबत कडक नियम लागू केलेत. पह्टो कसा असावा आणि अर्जात दुरुस्ती कशी करावी, यासाठी नवीन नियमावली देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी हे बदल नीट समजून घेणे गरजेचे आहे. एआय-आधारित फेशियल रेकग्निशन आणि आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांना पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्णपणे आधारशी जोडली जाणार आहे.

यूपीएससीने नियम बदलले
निवड झाल्यानंतर 2026 मध्ये ग्रुप अ सेवेसाठी पुन्हा उपस्थित राहू इच्छिणाऱया उमेदवारांसाठी यूपीएससीने नियम बदलले आहेत. अशा उमेदवारांना संबंधित विभागाकडून प्रशिक्षणातून सूट मिळाल्यास ते परीक्षेला बसण्यास पात्र असतील. जर त्यांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहून सूट मागितली नाही, तर त्यांचा 2026 चा अर्ज रद्द केला जाईल. शिवाय जर ते 2027 मध्ये पुन्हा यशस्वी झाले तर त्यांना दोन्ही सेवांपैकी एकाची निवड करावी लागेल आणि दुसरी रद्द मानली जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे आयएएससाठी अर्ज करणाऱया उमेदवारांकडे देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. भारतीय वन सेवा (आयएफएस) उमेदवारांकडे पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र आणि पृषी यासारख्या विषयांमध्ये पदवी असणे आवश्यक आहे.